Krushi Adhikari Update कृषि अधिकाऱ्यांच्या कामामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी त्यांना विविध सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. कृषि अधिकाऱ्यांनीही कृषि विभागाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात मार्गदर्शन वेळेत करावे, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयात उप कृषि अधिकारी यांच्या विविध मागण्यांविषयी बैठक झाली. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवडी, ‘राज्य उपकृषि अधिकारी संघटना, पुणे’चे अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस विक्रांत परमार, राजकुमार चापले, राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रंढे यासह इतर सदस्य उपस्थित होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, उपकृषि अधिकारी यांच्या कामात गतिमानता यावी यासाठी लॅपटॉप देण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. कृषि अधिकारी यांच्या बदल्या, पदोन्नती, आरोग्य बिले, विविध चौकशा वेळेत पूर्ण करणे, प्रवासभत्ता देय रकमेत वाढ करणे यासाठी प्रशासकीय स्तरावर आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येतील.
कृषि अधिकाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून कार्यालयीन कामात अधिक सुलभता येण्यासाठी विविध ॲप व संकेतस्थळ यांचा वापर वाढविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.



