मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आता महाडीबीटी प्रणाली द्वारे थेट खात्यात जमा होणार, शासन परिपत्रक जारी

By MarathiAlert Team

Published on:

इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी Mahadbt Pre Matric Scholarship योजना महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने १० नोव्हेंबर २०२५ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना

वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा कोणत्याही पात्र लाभार्थ्यापासून वंचित राहू नये यासाठी, शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व योजना आधार कार्डशी संलग्न करून दि. १०.०१.२०२३ पासून थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यासाठी महा-आयटी, मुंबई यांच्यामार्फत ही योजना महाडीबीटी प्रणालीवर ऑनबोर्ड करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पात्र विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्नित बँक खात्यावर शिष्यवृत्तीचा थेट लाभ मिळणार आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (Pre-Matric Scholarship Scheme) ही महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज (VJNT), इमाव (OBC), आणि विमाप्र (SBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.

योजनेची माहिती

  • योजनेचे नाव: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (Pre-Matric Scholarship/Merit Scholarship Scheme).
  • प्रवर्ग: विजाभज (VJNT), इमाव (OBC), आणि विमाप्र (SBC).
  • शैक्षणिक स्तर: इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
  • अंमलबजावणी: सन २०२५-२६ पासून ही योजना महा-आयटी, मुंबई यांच्यामार्फत महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
  • लाभ वितरण: शिष्यवृत्तीचा लाभ आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) मार्फत जमा केला जातो.

अर्ज भरण्याची आणि छाननीची प्रक्रिया (Application and Scrutiny Process)

या Mahadbt Pre Matric Scholarship योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि छाननी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ‘परिशिष्ट-अ’ नुसार विहित करण्यात आली आहे.

शाळेची भूमिका: संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना सरल प्रणाली/UDIS प्रणालीवर विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी लागेल. इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या विविध योजनांचे अर्ज भरण्याची कार्यवाही दरवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असेल.

गटशिक्षणाधिकारी स्तर: गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांनी मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेले अर्ज (Desk-१ वर) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम’ (First-cum-First) या तत्त्वानुसार छाननी करावी. अर्ज अपूर्ण किंवा चुकीचा आढळल्यास तो मुख्याध्यापकांच्या लॉगीनला परत पाठवला जाईल.

सहाय्यक संचालक स्तर: अचूक अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (Desk-२ वर) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. या स्तरावर लिपिक/निरीक्षक यांच्याकडून अर्ज तपासले जातील आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आणि फी रिसिट अचूक आहेत का, तसेच फी स्ट्रक्चर योग्य आहे का, याची खात्री केली जाईल. अर्ज ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम’ तत्त्वानुसार मंजूर करून महाआयटीकडे निधी हस्तांतरणासाठी पाठवले जातील.

अंमलबजावणी आणि नियंत्रणाचे स्वरूप

योजनेच्या अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी विविध स्तरावर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत:

नियंत्रण अधिकारी: प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग हे महाडीबीटी प्रणालीवरील जिल्हा-निहाय प्रक्रियेवर नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.

लेखाधिकारी: संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे नियंत्रण अधिकारी आणि लेखा अधिकारी, पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून काम पाहतील.

निधी हस्तांतरण: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून मंजूर झालेली तरतूद बँक ऑफ बडोदा, पुणे येथील बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. त्यानंतर महाडीबीटी प्रणालीवरील मंजूर अर्जदार विद्यार्थ्यांना ‘पुल अकाऊंटद्वारे’ निधी वर्ग करण्यात येईल.

महाआयटी (Maha-IT) कडून, सहाय्यक संचालक (Desk-२) यांनी मंजूर केलेल्या अर्जानुसार निधीतून थेट पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाईल. 

ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांपर्यंत त्वरीत आणि अचूकपणे लाभ पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी: Mahadbt Pre Matric Scholarship GR वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!