महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून (MPBCDC) अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराला बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM-AJAY) अंतर्गत ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत असून, याद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करून समाजातील या घटकाचे जीवनमान उंचावणे हा मुख्य उद्देश आहे.
आवश्यक पात्रता
अर्ज करण्यासाठी पात्रता:
- संवर्ग: अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध संवर्गातील असावा.
- वयोमर्यादा: १८ ते ५० वर्षे.
- उत्पन्न मर्यादा: ग्रामीण आणि शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये आहे.
- थकबाकीदार नसावा: अर्जदार या महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील:
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला.
- पाच पासपोर्ट आकाराचे फोटो.
- रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत.
- कोटेशन आणि व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या जागेचा पुरावा.
- व्यवसायानुसार इतर आवश्यक दाखले (उदा. परवाने).
- आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (Project Report).
- बँक खाते क्रमांक आणि पासबुकची झेरॉक्स प्रत.
विविध योजनांचा समावेश
या अर्ज प्रक्रियेत MPBCDC Loan Scheme अंतर्गत अनेक योजनांचा समावेश आहे. ज्यामध्ये अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाच्या (NSKFDC) शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती महादिशा पोर्टलवर सविस्तर उपलब्ध आहे.
महामंडळाने सर्व इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, अर्ज करण्यापूर्वी महादिशा पोर्टलवर उपलब्ध असलेली योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन अर्ज करून या MPBCDC Loan Scheme चा लाभ घ्यावा.
MPBCDC Loan Scheme: संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन
इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी कर्ज प्रस्तावांसाठी ‘महादिशा पोर्टल’ (Mahadisha Portal) वर अर्ज करणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्यासाठी https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. महामंडळाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि १००% ऑनलाईन असणार आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.




