ST Employee Update राज्य शासनाचा सार्वजनिक उपक्रम असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे आणि भविष्यात एसटीचे कधीही खासगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे (वॉटर प्युरिफायर आणि कूलर) लोकार्पण करताना ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ST Employee Update
कर्मचाऱ्यांच्या सुविधांना प्राधान्य:
मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी त्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि तेथील प्रसाधनगृहे स्वच्छ असणे आवश्यक आहे. लवकरच खासगी स्वच्छता संस्था नेमून या विश्रांतीगृहांची स्वच्छता केली जाईल. इतकेच नाही, तर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुवून इस्त्री करून देण्याची व्यवस्थाही केली जाईल. कर्मचाऱ्यांची दाढी आणि केश कर्तनाची (केस कापण्याची) व्यवस्था देखील या स्वच्छता संस्थेकडून करण्यात येईल.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे अशाप्रकारे लक्ष दिल्यास त्यांच्यासाठी कामाचे अनुकूल वातावरण तयार होईल. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीवर होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, कारण यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच एसटीच्या भविष्याबद्दलच्या चिंतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.


