राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम; 10 ते 15 जानेवारीदरम्यान निर्णय होणार

By MarathiAlert Team

Published on:

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारातील विलंब, तांत्रिक अडचणी व समायोजनाच्या मागणीबाबत निर्णायक पावले उचलली आहेत. संबंधित सर्व प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, केंद्र शासनाच्या नवीन एसएनए–स्पर्श प्रणालीमुळे वेतनास काही दिवस लागले. ऑनलाईन प्रक्रियेत अद्ययावत होण्यास तांत्रिक विलंब झाला. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. यापुढे दर महिन्यात वेळेवर वेतन होईल, यासाठी विभाग पूर्ण जबाबदारीने काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, एसएनए स्पर्शमधील उरलेल्या सहा–सात कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक प्रक्रियांही पूर्ण झाल्या असून, त्यांच्याही वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. 

10 ते 15 जानेवारीदरम्यान निर्णय होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून १० ते १५ जानेवारीदरम्यान निर्णय घेतला जाईल.

सेवा प्रवेश नियमांत बदल करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. हे सर्व निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आहेत, असे मंत्री आबिटकर यांनी  सांगितले.

मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यात वैद्यकीय प्रमाणपत्रे देण्यात होणाऱ्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 

वैद्यकीय खर्चाची देयके पारित करण्याच्या प्रक्रियेतही अनेक ठिकाणी अडथळे येतात. त्यामुळे सर्व वैद्यकीय खर्चाची देयके पारित होण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री समाधान आवताडे, नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!