आता 30,000 पर्यंत उत्पन्न असलेल्यांनाही ESIC चा लाभ; केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीतून सकारात्मक संकेत! ESIC New Update

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC New Update महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या महत्त्वाच्या भेटीत महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना (ESIC) रुग्णालयांच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. सविस्तर पाहूया.

प्रलंबित प्रश्न आणि सुविधांची मागणी

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी कामगार रुग्णालयांमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्रातील ESIC रुग्णालयांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्याची मागणी केली. विशेषतः त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे अंधेरी, कोल्हापूर आणि उल्हासनगर येथील ESIC रुग्णालयांच्या बांधकामांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधले. या रुग्णालयांची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करून ती कार्यान्वित केली जातील, असे आश्वासन डॉ. मांडविया यांनी दिले. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ESIC रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्याबाबतही विचार केला जाईल, असे ते म्हणाले.

अधिक कामगारांना आरोग्य सेवेचा लाभ

या भेटीतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचारी विमाधारक (IP) संख्या वाढवणे. डॉ. मांडविया यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. सध्या 21,000 रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना या योजनेचा लाभ मिळतो. ही उत्पन्न मर्यादा 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली. हा निर्णय झाल्यास अधिक कामगार ESIC च्या आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.

निधी वाढवण्याची मागणी आणि आढावा बैठका

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी राज्याला अधिक निधी देण्याची विनंती केली. सध्या महाराष्ट्रात कामगार विमा सोसायटीची पंधरा रुग्णालये असून, योजनेशी संलग्नित असलेल्या 450 खाजगी रुग्णालये आणि 134 सेवा दवाखान्यांच्या माध्यमातून कामगार व सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. राज्यात सध्या 48 लाख 70 हजार 460 विमाधारक कामगार असून, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दोन कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेतात.

केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मांडविया यांनी सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांच्यासमवेत मुंबईतील अंधेरी येथील ESIC रुग्णालयास लवकरच संयुक्त भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, राज्यातील सर्व ESIC रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

महाराष्ट्राला मिळणार गती

या भेटीमुळे महाराष्ट्रातील ESIC आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल आणि विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्य सचिव वीरेंद्र सिंग, ESIS चे आयुक्त रमेश चव्हाण आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीतील निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!