Cleaning Staff Minimum Wage राज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन लागू करण्याचे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितले.
राज्यात सध्या सुमारे १८०० रोजंदारी सफाई कामगार विविध पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. या कामगारांना इतर विभागांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान वेतन आणि भत्ते मिळावेत, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. या बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी या मागणीची दखल घेत सर्व रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन देण्याबाबत सूचना केली.
कायम कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू
यासोबतच, गृह विभागातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबतही चर्चा झाली. २०१७ च्या शासन निर्णयानुसार, या कामगारांना थकीत वेतनाची रक्कमही देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश कदम यांनी दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे, उपसचिव रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट आणि जीवन सुरुडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.