Pariksha Pe Charcha 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदाच्या परीक्षा पे चर्चा नोंदणी बाबत महाराष्ट्राची आकडेवारी अतिशय निराशाजनक असल्याचे समोर आले आहे. राज्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यल्प नोंदणी झाल्यामुळे केंद्र सरकारने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) २२ डिसेंबर २०२५ रोजी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, महाराष्ट्रासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC-2026) या कार्यक्रमांतर्गत एकूण ६५,००,००० (पासष्ट लाख) विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सहभागाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते.
मात्र, २२ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी पाहता, राज्यातून केवळ २,७८,५३५ जणांनीच नोंदणी केली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हा आकडा अत्यंत नगण्य असल्याने, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय (भारत सरकार) यांनी महाराष्ट्र राज्याच्या या संथ कामगिरीबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कोणी सहभाग घ्यायचा आणि अंतिम मुदत काय?
‘परीक्षा पे चर्चा’ या नवव्या पर्वात (PPC-2026) सहभागी होण्यासाठी १ डिसेंबर २०२५ पासूनच प्रक्रिया सुरू झाली असून, ती ११ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
कोण सहभागी होऊ शकते? इयत्ता ६ वी ते १२ वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक.
बक्षीस: सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र (Certificate) दिले जाईल.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन PPC Registration 2026 लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रक्रिया: https://innovateindia.mygov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन MCQ (बहुपर्यायी प्रश्न) स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांना कडक सूचना केंद्राच्या नाराजीनंतर राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत.
संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी आपापल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची तातडीने बैठक घ्यावी आणि ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आदेशात म्हटले आहे.
केवळ कागदी घोडे न नाचवता, प्रत्यक्ष कार्यवाही करून त्याचा अहवाल संचालनालयाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील शाळांमध्ये PPC Registration 2026 साठी मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाने आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमात स्वतःहून नोंदणी करून हा कार्यक्रम यशस्वी करावा. PPC Registration 2026 ची अंतिम तारीख जवळ येत असल्याने आता शाळांना वेगाने हालचाली कराव्या लागणार आहेत.
परीक्षा पे चर्चासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया






