Pat Test 2025 महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यापैकी पायाभूत चाचणीचे आयोजन ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिली आहे.
या चाचणीमध्ये प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचा समावेश असेल. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची ही चाचणी घेतली जाईल.
चाचणीचे उद्दिष्ट आणि फायदे:
या चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात अध्ययन निष्पत्ती प्राप्त केली आहे, हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुसार अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करणे आणि कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे. ही चाचणी १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांसारखी नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त ताण देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पायाभूत चाचणीचे प्रमुख उद्देश/उपयोग/फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- अध्ययनाचे मूल्यमापन या तत्त्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्त्वाकडे वळणे.
- विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे आणि त्यात वाढ करणे.
- अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.
- राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे.
- अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृती-कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे.
- इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे.
चाचण्यांचे वेळापत्रक:
तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे संभाव्य कालावधी खालीलप्रमाणे आहेत:
- पायाभूत चाचणी: ६ ते ८ ऑगस्ट २०२५
- संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र – १: ऑक्टोबर २०२५ चा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर २०२५ चा पहिला आठवडा
- संकलित मूल्यमापन चाचणी, सत्र – २: एप्रिल २०२६
पायाभूत चाचणीचे सविस्तर वेळापत्रक (६ ते ८ ऑगस्ट २०२५):
अ.क्र. | विषय | इयत्ता | चाचणी | दिनांक व वेळ | लेखी परीक्षेसाठी वेळ (शालेय वेळेत) | गुण |
१. | प्रथम भाषा (सर्व माध्यम) | दुसरी | लेखी+तोंडी | ०६/०८/२०२५ | ६० मिनिटे | २०+१० = ३० |
तिसरी व चौथी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ३०+१० = ४० | |||
पाचवी व सहावी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ४०+१० = ५० | |||
सातवी, आठवी | लेखी+तोंडी | १२० मिनिटे | ५०+१० = ६० | |||
२. | गणित (सर्व माध्यम) | दुसरी | लेखी+तोंडी | ०७/०८/२०२५ | ६० मिनिटे | २०+१० = ३० |
तिसरी व चौथी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ३०+१० = ४० | |||
पाचवी व सहावी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ४०+१० = ५० | |||
सातवी, आठवी | लेखी+तोंडी | १२० मिनिटे | ५०+१० = ६० | |||
३. | तृतीय भाषा (इंग्रजी) | दुसरी | लेखी+तोंडी | ०८/०८/२०२५ | ६० मिनिटे | २०+१० = ३० |
तिसरी व चौथी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ३०+१० = ४० | |||
पाचवी/सहावी | लेखी+तोंडी | ९० मिनिटे | ४०+१० = ५० | |||
सातवी, आठवी | लेखी+तोंडी | १२० मिनिटे | ५०+१० = ६० |
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र/दुपार सत्रानुसार वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे. तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर त्याच दिवशी वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी, विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी घेण्यात यावी.
अभ्यासक्रम आणि माध्यम:
चाचणीचा अभ्यासक्रम मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम/अध्ययन निष्पत्ती/मूलभूत क्षमता यावर आधारित असेल. सदर चाचणी एकूण दहा माध्यमांमध्ये आयोजित केली जाईल.
महत्त्वाच्या सूचना:
- चाचणी पत्रिका अंदाजे १४ जुलै २०२५ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत वितरित केल्या जातील.
- चाचणी पत्रिकांचे वाटप विद्यार्थी संख्येनुसार होईल आणि कमी पडल्यास झेरॉक्स काढण्यात आलेल्या पत्रिकांचे देयक अदा केले जाणार नाही.
- चाचणी पत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी. मोबाईलमधून फोटो काढणे किंवा समाजमाध्यमांद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार टाळावेत.
- चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झाल्यावर त्याची परीक्षा घ्यावी.
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत चाचणी घेण्याबाबतचा निर्णय शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांनी दिव्यांग प्रकारानुसार घ्यावा आणि आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षकांची मदत घ्यावी.
- शिक्षकांसाठीच्या सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील. उत्तरसूची चाचणीच्या दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.
- शिक्षक सूचना व उत्तरसूची फक्त शिक्षकांसाठी असून विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात.
- पायाभूत चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृती-कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
- चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार असून, याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.
- विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. गुणांचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल.
या चाचणीच्या यशस्वी आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद यांची असेल. राहुल अशोक रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.
अधिक माहितीसाठी : परिपत्रक वाचा