देशातील गर्भवती माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याच्या आणि माता व बालमृत्यू दरात घट करण्याच्या प्रमुख उद्दिष्टांसह केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY Yojana) आता महाराष्ट्र राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत (WCD) प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी झालेल्या शासन
निर्णयानुसार, या लेखात PMMVY Yojana काय आहे , या अंतर्गत पात्र लाभार्थींना किती लाभ मिळतो , योजनेसाठी आवश्यक पात्रता निकष , लागणारी कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना काय आहे?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
सकस आहारास प्रोत्साहन: गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे.
मृत्यू दरात घट: जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे आणि माता व बाल मृत्यू दर नियंत्रणात ठेवणे.
लिंग गुणोत्तर सुधारणा: स्त्री भ्रूणहत्येवर प्रतिबंध घालून स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी लाभदायी ठरणे.
संस्थात्मक प्रसूती: आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धींगत करणे.जन्म नोंदणी: नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीचे प्रमाण वाढवणे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ किती मिळतो?
PMMVY Yojana अंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला खालीलप्रमाणे लाभ तिच्या आधार संलग्न बँक/पोस्ट ऑफिस खात्यात डीबीटी (DBT) द्वारे जमा केला जातो:
पहिल्या अपत्यासाठी: विहित अटी/शर्ती पूर्ण केल्यास ₹५,०००/- चा लाभ दोन हप्त्यांमध्ये मिळतो.
पहिला हप्ता (₹३,०००/-): गर्भधारणेची नोंदणी आणि ६ महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) पूर्ण झाल्यास.
दुसरा हप्ता (₹२,०००/-): बाळाची जन्म नोंदणी आणि बालकाचे प्राथमिक लसीकरणाचे चक्र पूर्ण झाल्यास. दुसरे अपत्य मुलगी असल्यास: मुलीच्या जन्मानंतर विहित अटी/शर्ती पूर्ण केल्यास एकाच टप्प्यात ₹६,०००/- चा लाभ मिळतो.
आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय शेवटच्या मासिक पाळीच्या दिवशी किमान १८ वर्षे ७ महिने व कमाल ५५ वर्षे या दरम्यान असावे. तसेच, वय वर्ष १८ ते ५५ वयोगटातील खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करणारी महिला पात्र राहील:
- ज्यांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ₹८ लाखांपेक्षा कमी आहे.
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील.
- ४०% व अधिक अपंगत्व असणाऱ्या (दिव्यांग जन).
- बीपीएल (BPL) शिधापत्रिकाधारक.
- आयुष्यमान भारत (PMJAY) अंतर्गत लाभार्थी.
- ई-श्रम कार्ड धारक.
- किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
- मनरेगा जॉब कार्ड धारक.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW), अंगणवाडी मदतनीस (AWH), किंवा आशा कार्यकर्ती (ASHA).
- अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत रेशनकार्डधारक महिला लाभार्थी.
टीप: वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना (उदा. केंद्र/राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित सेवेत असलेल्या) या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कागदपत्रे कोणती?
लाभार्थ्याने वरील नमूद किमान एका पात्रतेच्या तपशीलासह खालील कागदपत्रे व माहिती देणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र.
- परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड (MCP Card), ज्यात शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, आणि प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
- बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
- माता आणि बाल संरक्षण कार्डवरील बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.
- गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
- लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक.
- वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र.
मातृ वंदना योजना फॉर्म कसा व कोठे भरावा?
PMMVY Yojana चा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे.
फॉर्म भरणे: नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केवळ अंगणवाडी सेविका/फिल्ड फंक्शनरी आणि स्वतः लाभार्थी यांना फॉर्म भरता येईल.
ऑफलाईन प्रक्रिया (सुरुवातीची): लाभार्थी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून (https://pmmvy.wcd.gov.in/) फॉर्म डाऊनलोड करू शकतात.
सादर करणे: हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार्थीने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह व सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा. याशिवाय, तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयातही अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधा.
पडताळणी आणि मंजूरी: अंगणवाडी सेविका फॉर्म ऑनलाईन नोंदणी करेल. त्यानंतर मुख्यसेविका/पर्यवेक्षिका (Supervisor) लाभार्थीची पात्रता पडताळणी करतील. अंतिम पडताळणी व मंजूरी देण्याची जबाबदारी मंजुरी अधिकारी (Sanctioning Officer/CDPO) यांची असेल.या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना केवळ आधार क्रमांकाच्या आधारावरच लाभ दिला जाईल. PMMVY च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना शासन निर्णय डाउनलोड करा





