राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यतेबाबत (Staffing Pattern) स्पष्टीकरण देणारे नवीन पत्र निर्गमित केले आहे. या पत्रानुसार पुढील शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांची पदे निश्चित करताना कोणती विद्यार्थी संख्या विचारात घ्यावी, याबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
Sanch Manyata 2025-26 साठी या तारखेपर्यंतची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार
शालेय शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना (प्राथमिक व माध्यमिक) दिलेल्या निर्देशानुसार, २०२५-२६ च्या संचमान्यतेसाठी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत यु-डायस प्लस (UDISE+) पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र, यामध्ये एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी, ज्या दिवशी प्रत्यक्ष Sanch Manyata प्रक्रिया प्रणालीवर ‘RUN’ केली जाईल, त्या दिवसापर्यंत जेवढे विद्यार्थी ‘आधार वैध’ (Aadhaar Valid) असतील, तीच संख्या संचमान्यतेसाठी अंतिम मानली जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयाचा नुसार, शाळांनी २० ऑक्टोबर २०२५ पूर्वी विद्यार्थ्यांची माहिती UDISE+ वर भरली असणे आवश्यक आहे. परंतु, केवळ माहिती भरून चालणार नाही, तर संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यांचे ‘आधार व्हॅलिडेशन‘ पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. आधार वैध नसेल, तर तो विद्यार्थी शिक्षक पदनिश्चितीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विशाल लोहार यांच्या स्वाक्षरीने हे पत्र २३ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता आगामी Sanch Manyata प्रक्रियेला वेग येणार असून, शाळांनी आपले आधार अपडेशनचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
यामुळे अतिरिक्त शिक्षक आणि पदांची निश्चिती करताना पारदर्शकता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात ही Sanch Manyata प्रक्रिया कशी राबवली जाते, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


















