दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे. शासकीय नोकरीतील आरक्षण असो, प्रवासातील सवलती किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ; या सर्वांसाठी दिव्यांगांकडे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच (UDID Card) असणे अत्यंत गरजेचे असते. हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, परंतु आता यातही काही गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्यासाठी राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता कडक पावले उचलली आहेत.
UDID कार्ड ‘या’ संस्थेमार्फत होणार तपासणी
अलीकडच्या काळात काही ठिकाणी बनावट किंवा चुकीचे वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करून (UDID Card) मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे काही लोक शासकीय योजना आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा अयोग्य लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामुळे ज्या खऱ्या आणि गरजू दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांच्या हक्कावर गदा येत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता पडताळणी प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही व्यक्तीला वैश्विक ओळखपत्र जारी करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची सत्यता संबंधित संस्थेमार्फत पडताळणे अनिवार्य असेल.
विशेषतः ‘अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज’ (AYJNISHD) या संस्थेच्या नावाने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी न करताच बनावट अहवाल तयार केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे, या संस्थेचे नाव असलेले श्रवण व भाषण तपासणीचे अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे आल्यास, त्यांनी ते थेट स्वीकारू नयेत. त्याऐवजी, त्या अहवालांची खात्री करण्यासाठी ते ayjnihh-mum@nic.in या संस्थेच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवून पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बोगसगिरी करणाऱ्यांवर होणार कारवाई दिव्यांगत्वाचे चुकीचे किंवा बनावट प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कुणी दोषी आढळल्यास ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६‘ मधील तरतुदींनुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
त्यामुळे चुकीची माहिती देऊन किंवा शॉर्टकटने दिव्यांगांचे प्रमाणपत्र आणि लाभ मिळवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









