Maharashtra State Council Of Examination Teacher Bharti 2026 : राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेच्या कामकाजाबाबत एक मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येणारी (Maharashtra Shikshak Bharti) प्रक्रिया आता शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हस्तांतरित करून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे नक्की काय बदल होणार आहेत आणि उमेदवारांवर याचा काय परिणाम होईल, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
शिक्षक भरती प्रक्रिया यापुढे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत राबविणार
शिक्षण आयुक्त कार्यालयावरील ताण कमी होणार गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे २०१७ पासून, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया ‘शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे’ यांच्या स्तरावरून हाताळली जात होती. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊ असते. यामध्ये जाहिराती स्वीकारणे, उमेदवारांचे प्राधान्यक्रम घेणे, आरक्षणानुसार कट-ऑफ लावणे आणि शिफारस याद्या तयार करणे अशा अनेक तांत्रिक बाबींचा समावेश असतो.
या प्रचंड कामामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयाचा बहुतांश वेळ शिक्षक भरतीमध्येच जात होता. परिणामी, शिक्षण विभागातील इतर महत्त्वाच्या योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीवर त्याचा विपरीत परिणाम होत होता. म्हणूनच, प्रशासकीय कामाचा हा ताण कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
आता ‘परीक्षा परिषद’ सांभाळणार जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही एक स्वायत्त संस्था असून, त्यांच्यामार्फत टीईटी (TET) आणि टेट (TAIT) यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. ज्या अर्थी परीक्षा घेण्याची जबाबदारी या परिषदेकडे आहे, त्या अर्थी पुढील निवड प्रक्रिया आणि भरतीचे कामकाजही याच संस्थेकडे असणे सुसंगत ठरेल, असे शासनाचे मत आहे.
त्यानुसार, ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२५’ आणि त्यापुढील काळातील सर्व (Maharashtra Shikshak Bharti) प्रक्रियेची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आली आहे.
नियंत्रणासाठी ‘सुकाणू समिती’ स्थापन जरी कामाची जबाबदारी परीक्षा परिषदेकडे दिली असली, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय ‘सुकाणू समिती’ (Steering Committee) स्थापन केली आहे. या समितीची रचना खालीलप्रमाणे असेल:
- अध्यक्ष: आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- सदस्य: अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद), शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक), आणि संचालक (एमएससीईआरटी).
- सदस्य-सचिव: आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
ही समिती शिक्षक भरतीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि महत्त्वाचे निर्णय घेईल.उमेदवारांसाठी काय महत्त्वाचे? हा निर्णय ३० डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला असून, आगामी काळातील शिक्षक भरती आता परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली पार पडेल.
एकाच संस्थेकडे परीक्षा आणि भरती प्रक्रिया आल्यामुळे कामात अधिक सुसूत्रता येईल आणि भरती प्रक्रिया वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Shikshak Bharti) संदर्भातील हा बदल प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अधिक माहितीसाठी : महाराष्ट्र शिक्षक भरती कामकाज संदर्भात शासन निर्णय येथे डाउनलोड करा









