TAIT Result 2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख अखेर जाहीर केली आहे. २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत झालेल्या या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी घोषित होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते.
TAIT Result 2025
TAIT Exam 2025 या परीक्षेत बी.एड. चे १५,७५६ आणि डी.एल.एड. चे १,३४२ असे एकूण १७,०९८ विद्यार्थी ‘अपीअर’ (Appear) श्रेणीमध्ये होते. यापैकी, १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत ९,९५२ बी.एड. विद्यार्थी आणि ८२७ डी.एल.एड. विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा परिषदेला प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल.
तथापि, ज्या उमेदवारांनी व्यावसायिक पात्रता परीक्षेचे गुणपत्रक किंवा इतर वैध प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही, अशा ६,३१९ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे. यात ५,८०४ बी.एड. आणि ५१५ डी.एल.एड. विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
निकाल जाहीर होण्यामागची अट काय? ज्या उमेदवारांनी त्यांचे व्यावसायिक पात्रतेचे (उदा. D.El.Ed. किंवा B.Ed.) प्रमाणपत्र परिषदेकडे सादर केले आहे, केवळ त्यांचेच निकाल जाहीर केले जातील. ज्यांनी अजूनही प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांचे निकाल थांबवून ठेवले जातील.
ज्या ‘अपीअर’ विद्यार्थ्यांनी अद्याप आपली माहिती सादर केली नाही, त्यांना ती
https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर लवकरात लवकर सादर करावी. दिलेल्या मुदतीत माहिती सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल आणि त्यानंतर कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
निकाल का रखडला? विविध संस्थांकडून व्यावसायिक परीक्षांचे (D.El.Ed./B.Ed.) निकाल वेगवेगळ्या दिवशी जाहीर झाल्यामुळे, TAIT २०२५ परीक्षेचा निकाल लावण्याकरिता आवश्यक माहिती संकलित करण्यास वेळ लागला. उदाहरणार्थ, D.El.Ed. चा निकाल ५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला. त्यामुळेच निकालास विलंब झाला होता.
निकाल कसा पाहाल? निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. निकाल जाहीर झाल्यावर, उमेदवार त्यांची गुणपत्रिका देखील डाउनलोड करू शकतील.
अफवांवर विश्वास ठेवू नका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांना कोणत्याही YouTube चॅनेल किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी, फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
