MAHACET Caste Validity Extension महाराष्ट्र राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET) अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, SEBC (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग) आणि OBC (इतर मागास वर्ग) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी आता ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा निर्णय २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
मुदतवाढीचे कारण काय?
राज्य सरकारने २६ ऑगस्ट २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, हा दिलासा देण्यात आला आहे. अलिकडेच SEBC आरक्षण कायदा लागू झाल्यामुळे तसेच मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत, जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊ नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ६ महिन्यांची मुदत: SEBC आणि OBC उमेदवारांनी ज्या दिवशी प्रवेशासाठी अर्ज केला आहे, त्या दिवसापासून पुढील ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- प्रवेश रद्द होण्याचा धोका: जर विद्यार्थ्यांनी या ६ महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल आणि त्यासाठी ते स्वतः जबाबदार असतील.
इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सूचना
या निर्णयाचा लाभ फक्त SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गातील (Other Reserved Categories) विद्यार्थ्यांसाठी १६ जून २०२५ च्या शासन परिपत्रकातील नियम लागू राहतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संबंधित नियमांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.
सीईटी सेलकडून जाहीर सूचना परिपत्रक, शासन निर्णय येथे पहा


