Cabinet Decisions 3 Sep मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये दिव्यांगांसाठीच्या अर्थसहाय्यात वाढ, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, तसेच कामगार कायद्यांमध्ये बदल यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. राज्याच्या विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
Cabinet Decisions 3 Sep
दिव्यांगांसाठी अर्थसहाय्यात वाढ
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी मिळणारे दीड हजार रुपये आता थेट अडीच हजार रुपये करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सध्या या दोन्ही योजनांमध्ये असलेले सुमारे ४ लाख ७५ हजार दिव्यांग लाभार्थी लाभान्वित होणार आहेत. हे वाढीव अर्थसहाय्य ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.
वीज केंद्रातील राखेच्या वापराबाबत नवीन धोरण
महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये तयार होणाऱ्या राखेच्या १००% पर्यावरणपूरक वापरासाठी एका नव्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणामुळे राखेचा योग्य विनियोग होण्यासोबतच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
राज्यातील नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेत राज्याच्या जुन्या योजनेपेक्षा अधिक शिष्यवृत्ती मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक लाभ मिळेल.
मुंबई आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना चालना
- मुंबई मेट्रो मार्गिका-११: मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. १७.५१ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी २३,४८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- पुणे आणि नागपूर मेट्रो: ठाणे, पुणे आणि नागपूर येथील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक कर्जे घेण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. यामुळे या शहरांमधील मेट्रो प्रकल्पांना वेग येणार आहे.
- पुणे मेट्रो स्थानके: पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके उभारण्यास तसेच कात्रज स्थानक सुमारे ४२१ मीटरने हलवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी महत्त्वाचे निर्णय
- २३८ लोकल गाड्यांची खरेदी: मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४,८२६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. हा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाच्या संयुक्त हिश्श्यातून देण्यात येईल.
- नवीन रेल्वे मार्गिका: मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (MUTP-3b) बदलापूर-कर्जत, आसनगाव-कसारा आणि पनवेल-वसई या मार्गांवर १३६ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी १४,९०७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी मार्गिका: पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी ५,१०० कोटी रुपये खर्च येणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
मंत्रिमंडळाचे इतर निर्णय येथे पाहा



