M Phil NET Exemption एम.फिल. पदवीधारक प्राध्यापकांच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) मधून सूट देण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) १४२१ प्राध्यापकांना NET परीक्षेतून सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला पूर्णविराम मिळाला असून, संबंधित प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून एम.फिल. पदवी धारण केलेल्या प्राध्यापकांना NET मधून सूट देण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार, १५ जुलै, २०२४ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला याबाबत एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी आयोगाने एका तज्ञ समितीची स्थापना केली होती.
या समितीने सादर केलेल्या शिफारशींनुसार, ११ जुलै, २००९ पूर्वी एम.फिल. पदवी पूर्ण केलेल्या आणि १४ जून, २००६ रोजी किंवा त्यापूर्वी नियमित/कायमस्वरूपी सेवेत नियुक्त झालेल्या १४२१ शिक्षकांना राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) मधून सूट देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २४ जून, २०२५ रोजी झालेल्या ५९१ व्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने २ जुलै, २०२५ रोजीच्या पत्राद्वारे कळवली आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील संबंधित प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या पत्रान्वये पुढील आवश्यक कार्यवाही करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय; पात्र अपात्र यादी पाहा