‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीतील पारदर्शकता आणि अचूकता यावर महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी विधानमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला सविस्तर उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ज छाननी आणि पडताळणी प्रगती
‘Ladki Bahin Yojana‘ अंतर्गत साधारण २ कोटी ६३ लाख अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी सुमारे २ कोटी ४३ लाख अर्ज विभागाने वैध ठरवले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या २६ लाख अर्जांची स्वतंत्र क्रॉस-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यातील बहुतांश अर्ज पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेटा क्रॉस-व्हेरिफिकेशन आणि अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई
योजनेतील लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यासाठी नमो शेतकरी योजना, शालेय शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर संबंधित खात्यांकडून डेटा मागवून ‘कॉमन लाभार्थ्यां’ची ओळख पटवण्यात आली. नियमांनुसार दोन्ही योजनांत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभ सुरू ठेवण्यात आले आहेत.
या पडताळणीत, अंदाजे ८ हजार लाभार्थी शासकीय नोकऱ्यांमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार हे लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांच्याकडून मिळालेली रकमेची वसुली प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.
मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे स्पष्ट निर्देश देऊन रिकव्हरीचे काम सुरू असून, पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे.
बँक खात्यांची समस्या आणि ई-केवायसीचा निर्णय
पडताळणीदरम्यान, सुमारे १२ ते १४ हजार प्रकरणांमध्ये महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्यामुळे वडील, भाऊ किंवा पती यांच्या बँक खात्यांचा संबंध जोडला गेल्याचे आढळले.
कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी स्वतंत्र क्रॉस-व्हेरिफिकेशन करून खऱ्या पात्र लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू ठेवली आहे.
Ladki Bahin Yojana ekyc : अंतिम मुदत
‘Ladki Bahin Yojana’ मध्ये लाभार्थ्यांचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी १३ महत्त्वाच्या निकषांसह ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या: “ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेतील लाभ वितरण अधिक सुटसुटीत आणि शिस्तबद्ध होईल.”आत्तापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून, उर्वरित लाभार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध आहे. यामुळे भविष्यात ‘Ladki Bahin Yojana’ चे लाभ अधिक कार्यक्षमतेने पोहोचवणे शक्य होईल.



