महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (AB-PMJAY) या एकत्रित विस्तारित योजनेत मोठे बदल केले आहेत. उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे, या निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना आता आरोग्य संरक्षणाचे अधिक व्यापक जाळे उपलब्ध होणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार संख्या वाढली!
राज्यात १ जुलै २०२४ पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे विस्तारित स्वरुपात राबविण्यात येत आहे. या विस्तारित योजनेत राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांचा लाभार्थी घटकांत समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, योजनेत ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण १३५६ उपचारांचा समावेश होता.
परंतु, गेल्या काही काळात योजनेत ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होणारे उपचार उपलब्ध नसल्याने, विशेषतः दुर्मिळ आजारांनी ग्रस्त गरीब रुग्णांना आरोग्य संरक्षण देण्यासाठी तसेच सध्याच्या उपचारांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत होती. या सर्व मागण्यांचा विचार करून, सरकारने उपचारांच्या संख्येत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन शासन निर्णयानुसार, योजनेत समाविष्ट असलेल्या विशेषज्ञ सेवांची संख्या ३४ वरून ३८ करण्यात आली आहे. या वाढलेल्या सेवांमुळे एकूण उपचारांची संख्या १३५६ वरून थेट २३९९ पर्यंत वाढली आहे.
यामुळे गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार घेणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विस्तारात बर्न मॅनेजमेंट (Burn Management), इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी (Interventional Radiology), इन्फेक्शियस डिसीजेस (Infectious Diseases) आणि विविध ऑन्कोलॉजी (Oncology) उपचारांचा समावेश असल्याची माहिती या MJPJAY disease list pdf मध्ये नमूद करण्यात आली आहे.
नवे दर निश्चितीचे धोरण
योजनेला अधिक उपयुक्त आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी, आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल २०२५ रोजी एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (National Health Authority) हेल्थ बेनिफिट पॅकेज (HBP)-२०२२ चा तुलनात्मक अभ्यास केला.
HBP-२०२२ मध्ये अधिक उपचारांचा समावेश असल्याने, त्यातील सर्व उपचार राज्यातील योजनेत समाविष्ट करून उपचारांची एक समग्र यादी तयार करण्यात आली.
या समितीच्या शिफारशीनुसार, अंगीकृत रुग्णालयांना पॅकेज दर अदा करण्याची राज्याची सध्याची प्रचलित पद्धत बंद करण्यात आली आहे. यापुढे, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे HBP-२०२२ चे Tier-३ चे विद्यमान दर हे ‘आधारभूत दर (Base package Rate)’ म्हणून लागू करण्यात येणार आहेत. उपचारांच्या पॅकेज दरात सुधारणा करण्याच्या या धोरणात्मक निर्णयामुळे अंगीकृत रुग्णालयांचा सहभाग वाढण्यास मदत होईल.
रुग्णालयांना मिळणार प्रोत्साहनपर लाभ
योजनेत उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुनिश्चित करण्यासाठी, अंगीकृत रुग्णालयांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
- NABH Entry Level मान्यता असलेल्या रुग्णालयांना १०%.
- NABH Full Accreditation किंवा NOAS National full Accreditation असलेल्या रुग्णालयांना १५%.
- Bronze Quality Certification असलेल्या रुग्णालयांना ५%.
- याशिवाय, ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ (Aspirational Districts & Blocks) मध्ये असलेल्या रुग्णालयांना अतिरिक्त १०% लाभ अनुज्ञेय राहील.
यामुळे ग्रामीण आणि मागास भागातील रुग्णालये सुधारित दरांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यास प्रवृत्त होतील. विशेषतः दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आरोग्य संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीने, उपचारांची ही विस्तारित यादी म्हणजेच सुधारित MJPJAY disease list pdf अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
योजनेची आर्थिक बाजू आणि प्रशासकीय अधिकार
या उपचारांचा खर्च प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा असेल. तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी आवश्यक निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना (SCP) व अनुसूचित जमाती उपयोजना (TSP) अंतर्गत) उपलब्ध करून देण्यात येईल.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, उपचारांच्या संख्येत, वर्णनात किंवा दरात बदल करण्याचे, तसेच शासकीय राखीव उपचारांचा फेरविचार करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिवांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या योजनेतील नवीन उपचारांची माहिती देणारा तपशीलवार MJPJAY disease list pdf सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही संपूर्ण आजाराची यादी डाउनलोड करू शकता.
अधिक माहितीसाठी : MJPJAY Disease list pdf Download Click Here
एकूणच, या निर्णयामुळे आरोग्य संरक्षणाची मर्यादा रू. ५ लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष कायम ठेवत, उपचारांची संख्या वाढवून आणि दरांमध्ये सुधारणा करून, महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठोस पाऊल उचलले आहे.
.



