Republic Day 2026: यंदाचा भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत खास आणि अविस्मरणीय ठरणार आहे. यावर्षी (Republic Day 2026) निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यातील तब्बल २ कोटी विद्यार्थी आणि ७ लाख शिक्षकांच्या सहभागातून होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती पाहूया.
महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनी होणार ऐतिहासिक विक्रम
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘राष्ट्र प्रथम’ (Nation First) या मुख्य संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
शासकीय ध्वजवंदन पार पडल्यानंतर लगेचच १५ ते २० मिनिटांच्या कालावधीसाठी ही सामूहिक कवायत घेतली जाणार आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाच वेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळांमधून, 7 लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत/ व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकाच वेळी देशभक्तीच्या रंगात रंगून जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून, प्रत्येक १० विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.
कसा असेल कार्यक्रमाचा सराव?
या उपक्रमासाठी सर्व शाळांना नमुना मार्गदर्शक व्हिडीओ (Guide Videos) पुरवण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून या कवायतींचा सराव करून घेतला जात आहे.
गावातील किंवा शहरातील उपलब्ध मैदानांच्या क्षमतेनुसार, विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात किंवा एका सार्वजनिक मैदानावर एकत्र आणून हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांना खास आमंत्रित करण्यात येणार आहे.
येत्या (Republic Day 2026) च्या या कार्यक्रमाचा मुख्य हेतू केवळ मनोरंजन नसून, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वयंशिस्त रुजवणे हा आहे. तसेच, मुलांमध्ये आरोग्याप्रति जागृती निर्माण व्हावी आणि त्यांना व्यायामाची गोडी लागावी, यासाठी हा खटाटोप करण्यात येत आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हे स्पष्ट केले आहे की, जे विद्यार्थी आजारी, अशक्त किंवा दिव्यांग असतील, त्यांना कवायत करण्याची कोणतीही सक्ती नसेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घेतच हा उत्सव साजरा केला जाईल. स्थानिक नागरिक आणि पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









