School Van Rules And Regulations विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच एक नवी, अधिक सुरक्षित आणि आधुनिक स्कूल व्हॅन नियमावली (गाइडलाइन्स) लागू केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना ही नियमावली लवकरच अंतिम करून त्याबाबत तात्काळ अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
School Van Rules And Regulations
नव्या नियमावलीची गरज का?
सध्या अनेक पालक विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी रिक्षांसारख्या असुरक्षित पर्यायांचा वापर करतात, कारण स्कूल बसचे भाडे त्यांना परवडत नाही. पण रिक्षांच्या तुलनेत व्हॅन जास्त सुरक्षित आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात आणि त्यात शाळेची बॅग तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित सुविधा देण्यासाठी ही नवीन नियमावली तयार केली जात आहे.
काय असेल या नव्या नियमावलीत?
- सुरक्षिततेला प्राधान्य: देशातील सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारच्या ‘AIS-204’ या मानकांवर आधारित ही नियमावली आहे. यात अनेक अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
- आधुनिक सुविधा: स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस (GPS), सीसीटीव्ही (CCTV) आणि डॅशबोर्डवर स्क्रीन, अग्निशमन अलार्म प्रणाली, स्पीड गव्हर्नर (ताशी ४० किमी वेगमर्यादेसह) आणि आपत्कालीन दरवाजे असतील.
- इतर सोयी: व्हॅनमध्ये लहान मुलांना चढण्यासाठी पायऱ्या असतील. तसेच, गाडीच्या छतावर शाळेचे नाव लिहिणे बंधनकारक असेल.
- मासिक भाडे: स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि १० महिन्यांसाठीच घेण्याचे बंधन असेल.
- रोजगाराची संधी: ही नवी नियमावली लघुउद्योगांना चालना देईल. १२+१ आसनांपर्यंतच्या BS-VI श्रेणीतील चारचाकी वाहनांना ‘शालेय व्हॅन’चा दर्जा मिळेल. यामुळे अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
- शाळा आणि परिवहन समित्या: प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा लागेल. तसेच, परिवहन समित्यांचे सक्षमीकरण केले जाईल आणि त्यांच्या मासिक बैठका घेणे बंधनकारक असेल.
परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होईल, पालकांची चिंता कमी होईल आणि त्याच वेळी अनेक तरुणांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडतील अशी अपेक्षा आहे. ही नियमावली लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.