राज्य शासनाने 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ (Notional Increment) मंजूर केली आहे. यामुळे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. हा निर्णय 2016 पासून लागू असेल. सविस्तर वाचा.
निवृत्तीनंतरही वाढणार पेन्शन; 1 जानेवारीची ‘काल्पनिक वेतनवाढ’ मंजूर
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Govt Employees) वित्त विभागाने एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा यापूर्वी निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारीची वेतनवाढ (Increment) विचारात घेऊन पेन्शन निश्चित केली जाणार आहे.
या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
नेमका निर्णय काय आहे?
यापूर्वी राज्य शासनाने 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ देऊन पेन्शन निश्चितीचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर आता 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
नवीन शासन निर्णयानुसार, जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होतील, त्यांना लगतच्या 1 जानेवारी रोजीची ‘काल्पनिक वेतनवाढ‘ (Notional Increment) मंजूर करण्यात आली आहे.
ही वेतनवाढ विचारात घेऊनच त्यांची सेवानिवृत्ती वेतन (Pension) निश्चित केली जाईल.
केंद्राच्या धर्तीवर मोठा दिलासा
केंद्र शासनाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) नियमानुसार वेतनवाढीचे दिनांक 1 जुलै किंवा 1 जानेवारी असे असतात.
त्यामुळे जे कर्मचारी वेतनवाढीच्या अगदी एक दिवस आधी (31 डिसेंबरला) निवृत्त होत होते, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. आता या निर्णयामुळे हे नुकसान भरून निघणार आहे.
निर्णय कधीपासून लागू होणार? (Effective Date)
हा निर्णय केवळ भविष्यात निवृत्त होणाऱ्यांसाठी नाही, तर यापूर्वी निवृत्त झालेल्यांसाठीही लागू आहे. सातवा वेतन आयोग 01.01.2016 पासून अंमलात आला असल्याने, सदर तरतूद ही दिनांक 01 जानेवारी 2016 पासून लागू राहील.
म्हणजेच, 2016 नंतर जे कर्मचारी 31 डिसेंबरला निवृत्त झाले आहेत, त्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होऊन त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- लाभार्थी: 31 डिसेंबरला निवृत्त होणारे राज्य शासकीय कर्मचारी.
- फायदा: 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ पेन्शनसाठी ग्राह्य धरली जाईल.
- लागू दिनांक: 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने.
- विभाग: वित्त विभाग, महाराष्ट्र शासन.
अधिक माहितीसाठी : 1 जानेवारीची ‘काल्पनिक वेतनवाढ’ शासन निर्णय येथे डाउनलोड करा












