Jal Sandharan Bharti Update महाराष्ट्रातील जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जलसंधारण विभागात लवकरच 8,767 नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली.
Jal Sandharan Bharti Update
मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, जलसंधारण विभागाने 8,767 पदांचा नवीन आराखडा तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. या सर्व पदांना आता ‘हाय पॉवर कमिटी’ने मंजुरी दिली आहे. यामुळे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ही भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाईल.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह डॉ. प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी आणि ॲड. अनिल परब यांनी विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री राठोड यांनी ही घोषणा केली.
विभागाला बळकटी देण्यासाठी नवीन कार्यालये:
मंत्री राठोड यांनी यावेळी विभागाच्या सक्षमीकरणासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांचीही माहिती दिली. ते म्हणाले की, या नवीन पदांमुळे विभागाची रचना अधिक मजबूत होईल. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर आयुक्तांचे नवीन कार्यालय सुरू केले जाईल. याव्यतिरिक्त, पालघर, वर्धा, सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची नवीन कार्यालयेही सुरू करण्यात येतील.
मंत्री राठोड यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जलसंधारण विभागाची स्वतंत्र निर्मिती झाली, तेव्हा १६,४९९ पदांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ९,९६७ पदे कृषी विभागाकडून तर ६,५१२ पदे जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाकडून वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, कृषी विभागाकडून फक्त २,१८१ पदांनाच मंजुरी मिळाली होती. आता नव्याने मंजूर झालेली पदे विभागाला अधिक बळकट करतील.
“आज जर महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम आणि तणावमुक्त करायचा असेल, तर जलसंधारण विभागाला बळकटी देणे आवश्यक आहे,” असे मंत्री राठोड यांनी सांगितले. त्यासाठी ही पदभरती अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भरतीमुळे जलसंधारण विभागाचे काम अधिक प्रभावीपणे होईल आणि महाराष्ट्राच्या पाणी व्यवस्थापनात सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.



