महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ (Magel Tyala Solar Pump Yojana) योजनेत केवळ देशातच नव्हे, तर जगात आपला ठसा उमटवत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. महावितरणने (MSEDCL) एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप (Solar Pumps) स्थापित करण्याचा विक्रमी उच्चांक गाठला आहे, ज्याची यशस्वी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप योजना नेमकी काय आहे ? सविस्तर पाहूया..
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकताच ५ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमधील ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

मागेल त्याला सौर कृषिपंप योजना नेमकी काय आहे ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ (Magel Tyala Solar Pump Yojana) या योजनेच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सौर पॅनेल्स आणि कृषिपंप यांचा संपूर्ण संच मिळतो. विशेष म्हणजे, यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागते.
अनुदान रचना:
- केंद्र सरकारकडून (प्रधानमंत्री कुसुम योजनेतून): ३० टक्के
- राज्य सरकारकडून: ६० टक्के
- शेतकऱ्याचा हिस्सा: १० टक्के
विशेष सवलत: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना तर केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
योजनेची ठळक वैशिष्टे
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
लाभार्थी निवडीचे निकष
- २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.
‘पेड पेंडिंग’ प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय
संपूर्ण देशात सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. राज्यात एकूण साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यामुळे कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा (‘पेड पेंडिंग’) प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टलही तयार केले आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना आपला हिस्सा भरायचा असतो.
पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड, महावितरण, एजन्सी आणि शेतकरी यांच्या संयुक्त पाहणीनंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो.
पंप बसवणाऱ्या एजन्सीवरच पुढील काळात देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असेल.
दिवसा सिंचन, २५ वर्षांसाठी वीजबिलातून मुक्ती
सौर कृषिपंप (Magel Tyala Solar Pump Yojana) योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडली आहे.
सौर पॅनेलमधून २५ वर्षांपर्यंत वीजनिर्मिती होत असल्याने, तेवढ्या काळात शेतकऱ्याला कृषिपंपाचे वीज बिल येत नाही.
हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार, दिवसा कधीही सिंचन करणे शक्य झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांची दिवसा वीजपुरवठ्याची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ (Magel Tyala Solar Pump Yojana) ही योजना राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी एक वरदान ठरली आहे.
अधिक माहितीसाठी : https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/



