Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana New Update सध्या व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी ५ वर्षांसाठी वाढवण्यात आल्याची एक बातमी मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मात्र, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने यासंबंधी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले असून, हा व्हायरल होत असलेला शासन निर्णय पूर्णपणे खोटा आणि जनतेची फसवणूक करणारा आहे. शासनाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत युवकांना सध्या केवळ ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना‘ सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत सुरुवातीला प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा होता, तो आता वाढवून ११ महिने करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) देखील दिले जाते, जे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होते.
मिळणारे विद्यावेतन असे आहे:
- १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना: प्रतिमाह रु. ६,०००
- आयटीआय किंवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना: प्रतिमाह रु. ८,०००
- पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थींना: प्रतिमाह रु. १०,०००
त्यामुळे, नागरिकांनी व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.