राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission – NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना विशेष बाब (Special Case) म्हणून समायोजित करण्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर गट-क (Group C) आणि गट-ड (Group D) मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रियाही पुढे नेण्याची विनंती करण्यात आली आहे.
15,010 NHM कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून मंजुरी
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कंत्राटी स्वरूपात सेवा बजावलेल्या 15,010 कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य (Supernumerary) पदे निर्माण करून नियुक्ती देण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
ही पदे नियमित रिक्त पदांऐवजी स्वतंत्रपणे अधिसंख्य स्वरूपात तयार करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र जाहिरात काढली जाणार नाही, असेही प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
NHM कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी तयार करण्यात येणारी अधिसंख्य पदे आणि नियमित भरतीची पदे वेगवेगळी असणार आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे गट-क आणि गट-डच्या नियमित भरतीवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट होते.
याच प्रस्तावात राज्यभरातील रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राज्यात अजूनही 7,155 पदे रिक्त
आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केलेल्या माहितीनुसार सध्या, गट-क मधील 5,307 पदे, गट-ड मधील 1,848 पदे, अशी एकूण 7,155 पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरावीत, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,090 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे. त्याचवेळी आरोग्य विभागातील 7,155 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठीही हालचाली वेगाने सुरू आहेत. मात्र, सध्या हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून अंतिम आदेश आणि अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया निश्चित होणार आहे.










