राज्यातील १३ जिल्हा परिषदांच्या अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत सर्वंकष विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या पदस्थापनेसंदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला आमदार राहुल कुल, ग्राम विकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच शिक्षक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, राज्यातील १३ जिल्हा परिषदांमध्ये काही भाग अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी कार्यरत शिक्षकांना नियमानुसार 3 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर बदलीची संधी दिली जाते. गेल्या वर्षी राज्यभरात सुमारे ६६ हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेमुळे यंदा अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही शिक्षकांच्या हिताचा विचार करून शासनाकडून योग्य आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अवघड आणि दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचेही मंत्री गोरे यांनी सांगितले.
बैठकीत शिक्षकांच्या अडचणी, विद्यमान बदली नियम तसेच जनगणनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्या आणि पदस्थापनेसंदर्भातील प्रलंबित मुद्द्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली.







