MH Construction Worker Update महाराष्ट्रातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या 90 दिवसांच्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता आणखी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने राबवली जाणार आहे.
हा निर्णय कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रधान सचिव आय. ए. कुंदन, ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले आणि विकास आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.
Table of Contents
बैठकीतील महत्वाचे निर्णय MH Construction Worker Update
सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट निर्देश देण्याचे आदेश
ग्रामविकास विभागाच्या २०१७ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत सध्या अनेक ग्रामसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने पुन्हा एकदा सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट निर्देश देण्याचे आदेश दिले आहेत.
शहरी भागात नोंदणी वाढविण्याचा निर्णय
मुंबई आणि इतर शहरी भागात हजारो बांधकाम कामगार कार्यरत आहेत. मात्र नोंदणी न झाल्यामुळे ते कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. यावर उपाय म्हणून नोंदणी मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचवण्याचा निर्धार
शासनामार्फत शिक्षण, आरोग्य, अपघात विमा, गृहनिर्माण यांसारख्या अनेक योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांना दिला जातो. त्यामुळे प्रत्येक पात्र कामगाराची नोंदणी करून “शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचवण्याचा निर्धार” व्यक्त करण्यात आला.
बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी. पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिल्या.