NCMC Smart Card Registration: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘National Common Mobility Card’ (NCMC) प्रणाली लागू केली आहे.
NCMC Smart Card Registration सुरू
सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरु झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून, या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बैंक यांच्याशी करार केला आहे.
एसटी प्रवासातील शासनाच्या सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला.
यापूर्वी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना कार्ड मिळाले नसल्याने मुदत वाढविण्यात आली आहे. शासनाने पात्र लाभार्थ्यांना वाढीव मुदतीत NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
NCMC कार्ड कोणाला मिळणार?
या नव्या योजनेत समाजातील विविध सवलती धारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
- विद्यार्थीः शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
- ज्येष्ठ नागरिक व महिलाः अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
- दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
- पुरस्कारार्थी व पत्रकारः स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय, आगारा मार्फत वितरण.
NCMC कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय
१) किंमतः नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध
२) वॉलेट मर्यादाः किमान १०० रुपयेः ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
३) रिचार्ज सुविधाः ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
अधिक माहितीसाठी : https://msrtc.maharashtra.gov.in/
एसटी प्रवाशांसाठी आता ‘NCMC’ कार्ड असेल तरच मिळणार सवलत; जाणून घ्या नवे नियम








