राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया आता पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाइन (Online) पद्धतीने होणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यामुळे पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांना निष्पक्षपणे संधी मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.
जिल्हा बँक भरती: स्थानिक उमेदवारांना प्राधान्य | DCC Bank Recruitment in Maharashtra
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने शासनाने हा बदल केला आहे. मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता DCC (जिल्हा मध्यवर्ती सहकारी) बँकांच्या परीक्षा घेण्यासाठी IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन), TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) यांसारख्या नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
या नव्या धोरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळणार असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने, त्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना नोकर भरतीत विशेष संधी मिळणार आहे.
- ७०% जागा: संबंधित जिल्ह्याच्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव. यासाठी उमेदवाराकडे संबंधित जिल्ह्याचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे बंधनकारक आहे.
- ३०% जागा: जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील.
स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना मंत्री पाटील म्हणाले की, स्थानिक कर्मचारी बँकेचे ग्राहक, सभासद आणि ठेवीदार यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातात, ज्यामुळे ते उत्तम सेवा देऊ शकतील.
सहकार आयुक्त स्तरावर तयार केलेल्या आणि शासनाने मंजुरी दिलेल्या या मार्गदर्शक सूचनांमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकांमधील भरती प्रक्रिया अधिक विश्वसनीय आणि जनतेचा विश्वास वाढवणारी ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती प्रक्रिया Online आणि Domicile Certificate धारकांना ७०% आरक्षण यामुळे DCC बँकांच्या नोकरभरतीला एक नवे व पारदर्शक स्वरूप मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकांमधील भरती प्रक्रिया शासन निर्णय डाउनलोड करा





