समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०१५-१६ पासून कार्यरत असलेल्या व्यवसाय शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अल्प मानधनावर कार्यरत असलेल्या या शिक्षकांना शासन सेवेत समाविष्ट करणे, समान कामास समान वेतन देणे आणि सेवा संरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे, याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले.
(2 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभाग संबंधित बहुतांश प्रश्न पीडीएफ डाउनलोड लिंक शेवटी दिलेली आहे)
समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याबाबत
(३१) * ९११६ श्री. किरण सरनाईक : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-
(१) राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन २०१५-१६ पासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे ८६५ शाळांमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत व्यवसाय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे माहे मे, २०२६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर नियुक्त्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आल्या असून, योजना यशस्वी ठरल्यास संबंधित व्यवसाय शिक्षकांना टप्प्याटप्प्याने शासन सेवेत सामावून घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते, तसेच दिनांक २६ डिसेंबर, २०२२ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेमध्ये संबंधित शिक्षकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत कार्यरत शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी, भत्ते, निवृत्तीवेतन व इतर सेवा-सुविधा उपलब्ध होत असताना, समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षकांना गेल्या दहा वर्षांपासून अत्यल्प मानधनावर व कंत्राटी स्वरूपात काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात २०१५-१६ पासून कार्यरत व्यवसाय शिक्षकांना आसाम राज्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, समान कामास समान वेतन लागू करणे, सेवा संरक्षण देणे व नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याबाबत खुलासा
श्री.दादाजी भुसे :
(१) होय, हे अंशतः खरे आहे.
(२) व (३) हे खरे नाही.
(४) राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. सदर व्यवसाय प्रशिक्षण संस्था ह्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) या संस्थेच्या मान्यता प्राप्त असून NSDC संस्थेकडून सदर प्रशिक्षण संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत व्यवसाय शिक्षण उपक्रम राबविले जाते.
सद्यःस्थितीत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेमार्फत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड केलेल्या संस्थामार्फत मंजूर असलेल्या सर्व शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षकांची नियुक्ती ही व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत (त्रयस्थ संस्थाद्वारे) करण्यात येत असल्याने, व्यवसाय प्रशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबत नियमानुसार कोणतीही तरतूद नाही.
(५) प्रश्न उद्भवत नाही.
अधिक माहितीसाठी : 2 जुलै 2026 तारांकित प्रश्नोत्तरे पीडीएफ डाउनलोड करा








