राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा‘ योजनेत राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ई-रिक्षा खरेदीवर मिळणारे शासन अनुदान २० टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा रोजगार उभारण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार असून, राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळणार आहे.
पूर्वीच्या लाभार्थींनाही मिळणार वाढीव अनुदान
या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाढीव ४० टक्के अनुदान पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या महिलांनाही सुधारित अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अशा लाभार्थींना कर्ज परतफेडीसाठी २० टक्क्यांऐवजी ४० टक्के शासन अनुदान दिले जाणार आहे.
लाभार्थींचे जिल्हानिहाय फेरवाटप
महिला व बाल विकास विभागाला जिल्हानिहाय लाभार्थी संख्येचे फेरवाटप करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार योजनेमध्ये नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्याचाही अधिकार विभागाकडे राहणार आहे. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि गरजेनुसार करता येणार आहे.
आर्थिक रचना कशी असेल?
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकूण किमतीपैकी किमान १० टक्के स्वभांडवल उभारावे लागेल. उर्वरित ५० टक्के रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी Partial Deferred Payment Facility द्वारे किंवा विविध सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल. शासनाकडून मंजूर होणारे ४० टक्के अनुदान थेट देण्यात येईल.
अनुदानाचे वितरण कोण करणार?
योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या शासन अनुदानाचे वितरण आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या कार्यालयामार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्याचे अधिकारही महिला व बाल विकास विभागाकडे असतील.
महिलांच्या सक्षमीकरणाला नवी गती
पिंक ई-रिक्षा योजनेतील अनुदान दुप्पट करण्याचा हा निर्णय राज्यातील हजारो महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे. कमी आर्थिक गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून, महिलांचे उत्पन्न वाढण्यास आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यास या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील 10 हजार महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा; सविस्तर तपशील जाणून घ्या









