Doctors Strike राज्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. रुग्णसेवेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वैद्यकीय संघटनांची परंपरा लक्षात घेऊन डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नेमके प्रकरण काय आहे?
मंत्री मुश्रीफ यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला (IMA) आवाहन करताना म्हटले आहे की, आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोंदणी देण्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे.
याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका क्र. ७८४६/२०१४ आणि ७८४७/२०१४ मधील अंतरिम आदेशांच्या अधीन राहून आणि याचिकेच्या अंतिम निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
या प्रकरणी विधी व न्याय विभाग तसेच महाधिवक्ता यांच्या अभिप्रायानुसार, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, या संपूर्ण प्रकरणात उच्च न्यायालय जो अंतिम निर्णय देईल, तो राज्य सरकारला मान्य असेल.
संप मागे घेण्याचे आवाहन
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने डॉक्टरांनी संप करून रुग्णांना वेठीस धरू नये. राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पुकारलेला संप तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संपाचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या आरोग्य सेवेवर होत असल्यामुळे हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


