राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. रुग्णालयातील आरोग्य सेवा, स्वच्छता, रुग्णाभिमुख सुविधा तसेच सेवा वितरणाच्या गुणवत्तेचा आढावा घेत त्यांनी रुग्णालयाचे काम समाधानकारक असून उत्तम पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले.

भेटीदरम्यान त्यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधत गावपातळीवरील आरोग्य सेवांमध्ये त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत पोहोच आणि जनजागृतीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या कामातील अनुभव, अडचणी आणि सूचना मांडल्या. त्यावर आयुक्तांनी आवश्यक मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
याशिवाय शेंडा पार्क, कोल्हापूर येथे अधिक चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जागेची पाहणीही करण्यात आली.
दुपारच्या सत्रात शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा हिवताप अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने यांनी विभागातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम, उपलब्धी, आव्हाने आणि आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.

अध्यक्षीय भाषणात आयुक्त संजय काटकर यांनी आरोग्य विभागाचा खरा पाया अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे यश अवलंबून असल्याचे नमूद करत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन केले.
बैठकीत विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना आणि अनुभवांचे त्यांनी स्वागत केले. प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभवांवर आधारित अशा कल्पना आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे सकारात्मक अनुभवांचा परस्पर आदान-प्रदान करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामकाज अधिक परिणामकारक करण्यासाठी स्मार्ट कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देताना त्यांनी योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेचे व्यवस्थापन आणि परिणामकेंद्रित कामावर भर देण्यास सांगितले. तसेच सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि संघभावना ही यशस्वी प्रशासनाची प्रमुख तत्त्वे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सेवा वितरणाची गुणवत्ता, कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतील अडचणी, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर आणि आगामी कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. विविध अधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर आयुक्तांनी आवश्यक मार्गदर्शन केले.
बैठकीच्या शेवटी विभागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. डॉ. दिलीप माने यांनी उपस्थित मान्यवर आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानत आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढविण्यास निश्चित दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला.









