Contract Workers Minimum Wage छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार निश्चित केलेल्या किमान वेतनानुसार थेट त्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. कंत्राटदारांमार्फत होणारी वेतन निश्चिती आणि अदाई यात पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
विधानमंडळ समिती कक्षात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपाध्यक्ष बनसोडे यांनी हे आदेश दिले. या बैठकीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीधर आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच, सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले यांचीही उपस्थिती होती.
Contract Workers Minimum Wage
Contract Workers Minimum Wage महानगरपालिकेच्या विविध कामांसाठी कंत्राटदारांमार्फत नेमलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला. महानगरपालिकेकडून कंत्राटदारांना कामगारांच्या वेतनाची रक्कम दिली जात असली तरी, कंत्राटदार ती कामगारांना योग्यरित्या देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून, कंत्राटदाराने कामगारांच्या बँक खात्यात जमा केलेल्या वेतनाची महानगरपालिका अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, असे आदेश उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले.
याशिवाय, कंत्राटदाराने कामावरून काढलेल्या २५० कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही बनसोडे यांनी केल्या. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीधर यांनी यावर सांगितले की, ज्या कंत्राटदारांनी कामगारांना वेतन दिले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच, कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा कामावर घेण्याबाबतही कार्यवाही केली जाईल.
पिंपरी चिंचवडमधील विकासकामांचा आढावा
या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांच्या नियोजन आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले. यामध्ये मोशी येथे न्यायसंकुल इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह इमारत, अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय व प्रयोगशाळा इमारत, चिखली येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी नवीन इमारत आणि रावेत येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट साठवणुकीसाठी गोदाम इमारतीच्या बांधकामांचा समावेश आहे. यावेळी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, कक्ष अधिकारी संदीप पाटील, कामगार उपायुक्त ल. य. भुजबळ यांच्यासह पोलीस, कामगार, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी आस्थापनांमधील कामगारांच्या समस्यांवर चर्चा
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या बैठकीत पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकमान्य हॉस्पिटल, भांबोली येथील प्लास्टिक ओमनियम प्रा. लि., धानोरी येथील मे. राठी ट्रान्सपॉवर, पॉलीबाँड यांसारख्या खासगी आस्थापनांमधील कामगारांच्या तक्रारींचाही आढावा घेतला. न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांवर यावेळी चर्चा झाली आणि न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले आणि कामगार संघटनेचे अर्जुन सुद्रिक यांच्यासह अनेक अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.