केंद्रप्रमुख परीक्षा 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन आदेश जारी

Published On: January 28, 2026
Follow Us
Kendrapramukh Exam Latest Update 2026

Kendrapramukh Exam Latest Update: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि केंद्रप्रमुख पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या धामधुमीत केंद्रप्रमुख परीक्षेचे नियोजन कसे होणार, याबाबत उमेदवारांच्या मनात धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE Pune) जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून यावर तोडगा काढला आहे. यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Kendrapramukh Bharti Exam 2026: MSCE पुणे कडून नवीन आदेश जारी

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. याच काळात, शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक/केंद्रप्रमुख पदाच्या २४१० रिक्त जागांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

निवडणूक कामाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या तारखा एकाच वेळी आल्याने, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा सांभाळायच्या, असा प्रश्न शिक्षक उमेदवारांना पडला होता. विशेष म्हणजे, राज्यभरातून तब्बल ४६,०६८ शिक्षक या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले आहेत. जून २०२३ पासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागत असताना त्यात पुन्हा निवडणुकीचा अडथळा येऊ नये, यासाठी परीक्षा परिषदेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी संबंधित १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या १२ जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत, तेथील उमेदवारांची परीक्षा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. जेणेकरून ४ फेब्रुवारीला अंतिम प्रशिक्षण घेऊन ते ५ तारखेच्या मतदानासाठी केंद्रावर जाऊ शकतील.

तथापि, जर काही जिल्ह्यांमध्ये ३ फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रशिक्षण आयोजित केले असेल, तर त्यामुळे शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी परिषदेने (Kendrapramukh Exam Latest Update) नुसार खालील निर्देश दिले आहेत.

  • ज्या शिक्षक उमेदवारांची परीक्षा ३ फेब्रुवारीला आहे, त्यांना त्या दिवशीच्या निवडणूक प्रशिक्षणातून शिथिलता (सवलत) देण्यात यावी. 
  • अशा उमेदवारांचे निवडणूक प्रशिक्षण ३ तारखेऐवजी १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात यावे. 
  • यामुळे शिक्षकांना ३ तारखेला निर्धास्तपणे परीक्षा देता येईल आणि ५ तारखेला निवडणूक कर्तव्यही पार पाडता येईल.

या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी मोठा दिलासा

केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया विविध न्यायालयीन आणि प्रशासकीय कारणांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित होती. आता कुठे परीक्षेची तारीख निश्चित झाली असताना, निवडणूक ड्युटीमुळे संधी हुकण्याची भीती शिक्षकांना वाटत होती. मात्र, प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि (Kendrapramukh Exam Latest Update) मुळे आता कोणतीही अडचण येणार नाही.

ही सवलत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

Kendrapramukh Exam Latest Update 2026

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment