मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026 पात्रता निकष, नियम आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

Published On: April 10, 2026
Follow Us
Mukhyamantri Fellowship Yojana 2026

Mukhyamantri Fellowship Yojana 2026: राज्यातील कल्पक आणि ध्येयवादी तरुणांना शासकीय यंत्रणेत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्यांच्यातील नाविन्यपूर्ण विचारांचा फायदा प्रशासनाला व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२६-२७’ राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. नियोजन विभागाने ८ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला असून, यंदाही ६० तरुण फेलोची निवड केली जाणार आहे.

प्रशासकीय कार्याचा प्रत्यक्ष अनुभव

मुख्यमंत्री फेलोशिप हा केवळ एक प्रशिक्षण कार्यक्रम नसून, तरुणांना थेट सरकारचा भाग होऊन लोकसेवेची संधी देणारा प्रकल्प आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोचा दर्जा शासकीय सेवेतील ‘गट-अ’ अधिकाऱ्यांच्या समकक्ष ठेवण्यात आला आहे.

यामुळे तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका किंवा मंत्रालयातील विविध विभागांमध्ये थेट धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सहभागी होता येते.

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष

या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि चुरशीची असते. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा आणि त्याचे वय २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असून, पदवीमध्ये किमान ६०% गुण अनिवार्य आहेत.

याशिवाय, अर्जदाराकडे किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप हा अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाईल.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडते. प्रथम ३० गुणांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी घेतली जाईल. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी पहिल्या २१० उमेदवारांना ऑनलाईन निबंध (२० गुण) सादर करावा लागेल.

या दोन्ही टप्प्यांनंतर पात्र उमेदवारांची मुंबई येथे ५० गुणांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. या तिन्ही निकषांच्या आधारे अंतिम ६० फेलोंची निवड केली जाईल.

मानधन किती?

निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ५६,१०० रुपये मानधन आणि ५,४०० रुपये प्रवास खर्च, असे एकूण ६१,५०० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), बॉम्बे सोबत असलेली भागीदारी. फेलोशिपच्या कालावधीत सर्व फेलोंना ‘सार्वजनिक धोरण’ (Public Policy) या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आयआयटी बॉम्बेकडून स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल, जे त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी अत्यंत मोलाचे ठरेल.

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांना अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ५०० रुपये शुल्क भरून अर्ज करावा लागेल. एकूण ६० जागांपैकी १/३ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमात काम करताना फेलोंना आठ दिवसांची किरकोळ रजा मिळेल आणि त्यांना पूर्णवेळ शासकीय नियमांचे पालन करावे लागेल.

शासनाने स्पष्ट केले आहे की, हा कार्यक्रम निव्वळ १२ महिन्यांचा कंत्राटी स्वरूपाचा अनुभव आहे. यामुळे सरकारी नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा कोणताही हक्क उमेदवाराला मिळणार नाही.

तरीही, प्रशासनातील गुंतागुंतीचे कामकाज समजून घेण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी ठोस करण्यासाठी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी मानली जात आहे.

Mukhyamantri Fellowship Yojana 2026 : https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

अधिक माहितीसाठी: मुख्यमंत्री फेलोशिप २०२६-२७ शासन निर्णय डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment