PM POSHAN Yojana: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त वाढीव मानधन वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. किती निधी मंजूर झाला आणि कोणाला लाभ मिळणार? सविस्तर वाचा.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (PM POSHAN) ही केंद्र प्रायोजित योजना असून शाळांमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत शाळांमध्ये अन्न तयार करण्याचे व वितरणाचे काम स्वयंपाकी व मदतनीसांकडून केले जाते. हे कर्मचारी मानधन तत्वावर कार्यरत असतात.
स्वयंपाकी आणि मदतनीस यांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार
राज्यातील शाळांमध्ये दुपारचे जेवण तयार करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २ मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत (PM-POSHAN) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे.
स्वयंपाकी आणि मदतनीस वाढीव मानधन नेमका निर्णय काय?
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना दरमहा २५०० रुपये मानधन दिले जाते.
यामध्ये ६०० रुपये केंद्र हिस्सा आणि ४०० रुपये राज्य हिस्सा (एकूण १००० रुपये) याआधीच वितरीत करण्यात आले होते.
आता, राज्य शासनाने आपल्या हिश्श्यातून अतिरिक्त १५०० रुपये प्रतिमाह देण्याचा निर्णय घेतला आहे.
या अतिरिक्त निधीसाठी शासनाने एकूण २ कोटी ८३ लक्ष १३ हजार रुपये मंजूर केले आहेत.
कोणाला मिळणार लाभ?
सदर निधी हा शालेय पोषण आहार अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आला आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना या निधीच्या विहित कालावधीत खर्चाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर २०२६०३०२१७४४५५९५२१ या संकेतांकासह उपलब्ध आहे.







