MPSC परीक्षा संदर्भात 5 मोठे निर्णय; उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट

Published On: June 28, 2026
Follow Us
mpsc exam new update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आयोगाच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे परीक्षांचे निकाल जलद लागतील तसेच भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.

mpsc exam new update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितले की, यापूर्वी परीक्षा निकाल आणि पुढील निवड प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी आयोगाने व्यापक सुधारणा सुरू केल्या असून, आता पूर्व परीक्षांचे निकाल अवघ्या 21 दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल 22 दिवसांत जाहीर करण्यात आला असून, यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

आयोगाने आणखी एक महत्त्वाचे लक्ष्य निश्चित केले आहे. ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. मुलाखत असलेल्या पदांसाठी संपूर्ण निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यांत पूर्ण केली जाईल, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची भरती प्रक्रिया 6 ते 7 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे उमेदवारांच्या करिअरमधील अनिश्चितता कमी होऊन त्यांना वेळेत नियुक्ती मिळण्यास मदत होईल.

अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले की, CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आला आहे. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक लेखी पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत.

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीबाबत उमेदवारांमध्ये असलेल्या शंकांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, ही कोणतीही नवीन प्रणाली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी सुमारे 140 परीक्षा याच पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या आहेत. ही पद्धत वैज्ञानिक असून न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि देशभरातील विविध भरती संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

देशातील विविध भरती संस्थांचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते. तसेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने (RRB) सुमारे 1 कोटी उमेदवारांच्या भरती परीक्षा याच प्रणालीद्वारे यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांनीही अलीकडेच 16.30 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेतल्या आहेत. याशिवाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही हीच प्रणाली वापरली जाते.

आयोगाच्या मते, CBT पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल. निकाल लवकर जाहीर होतील, भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि उमेदवारांना निश्चित वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण होण्याचा मोठा दिलासा मिळेल.

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment