महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (MSCE) रविवार, २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET 2026) पुढे ढकलण्यात आली आहे. पेपरफुटीच्या संशयासंदर्भात समोर आलेल्या गंभीर माहितीनंतर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, २७ जूनच्या पहाटे भिवंडी येथे काही संशयितांकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून संशयितांना ताब्यात घेतले.
यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आणि २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा मेळ आढळून आला. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि राज्य शासनाने २८ जून २०२६ रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची पारदर्शकता अबाधित राहावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, टीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा देताना सरकारने स्पष्ट केले आहे की, परीक्षा पुन्हा घेण्यात येईल; मात्र त्यासाठी उमेदवारांना नव्याने नोंदणी करण्याची किंवा पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
परीक्षेची नवीन तारीख आणि इतर सर्व अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे समोर आलेल्या या प्रकरणामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेला कोणताही धक्का लागू नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील लाखो टीईटी परीक्षार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा असून आता सर्व उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या नव्या वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.









