Balbharati New Syllabus 2025 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, ‘बालभारती‘ ने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रमातील बदलांबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आता टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळांमध्ये केली जात आहे.
Balbharati New Syllabus 2025
शैक्षणिक बदलांचे प्रमुख टप्पे आणि तपशील
नियमित पाठ्यपुस्तके कायम: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) खालील प्रमाणे नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे.
- शैक्षणिक वर्ष २०२५-२६: इयत्ता १ ली
- शैक्षणिक वर्ष २०२६-२७: इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी
- शैक्षणिक वर्ष २०२७-२८: इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी
- शैक्षणिक वर्ष २०२८-२९: इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी
इयत्ता १ लीसाठी नवीन पुस्तके: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १ लीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. इयत्ता १ ली ते ८ वीची सर्व नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून दिली जातील.
‘खेळू-करू-शिकू’ ऐवजी शिक्षक हस्तपुस्तिका: इयत्ता १ लीसाठी असलेले ‘खेळू-करू-शिकू’ हे पाठ्यपुस्तक बदलून त्याऐवजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षक हस्तपुस्तिका तयार करण्यात येणार आहे.
इतर भाषांच्या पुस्तकांबद्दल स्वतंत्र सूचना:
- इयत्ता १ लीसाठी ‘खेल खेल मे सिखे हिंदी’ (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत सर्व संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
- मराठीव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ मराठी या पाठ्यपुस्तकासंदर्भातही स्वतंत्र सूचना दिली जाईल.
काही इयत्तांसाठी शेवटचे वर्ष: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (जून २०२५) हे इयत्ता २ री, इयत्ता ३ री, इयत्ता ४ थी व इयत्ता ६ वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असेल. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी असे मंडळाने कळवले आहे.
एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील समानता: इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या एकात्मिक आणि नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय तसेच मूल्यमापन योजना समान आहेत. ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत.
विक्रेत्यांना सवलत: पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के सवलत देण्यात येते. मात्र, दिनांक २६ मार्च २०२५ पासून फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर अधिकचा ५% वटाव (सवलत) दिला जाईल. या रकमेचे समायोजन हंगाम कालावधी संपल्यानंतर करण्यात येईल.
शिल्लक पुस्तकांबद्दल निर्णय: इयत्ता ३ री ते ८ वीच्या शिल्लक असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांवर विक्री हंगामानंतर नियामक मंडळाच्या सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि तो सर्व संबंधितांना कळविण्यात येईल.
या महत्त्वपूर्ण बदलांची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित घटकांनी घ्यावी, असे आवाहन संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे-४, कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
बालभारतीची अधिकृत वेबसाईट : https://balbharati.co.in/

