Ladki Bahin Yojana Status मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील ५ वर्षांत ‘लाडकी बहीण योजने’सह महिलांसाठीच्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. यावेळी महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून, महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर राहिल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Ladki Bahin Yojana Status नवीन अपडेट
महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या सर्व योजना पुढील पाच वर्षांतही सुरूच राहणार आहेत, अशी मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. सध्या सुरू असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘ (Ladki Bahin Yojana) महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असून, भविष्यातही महिलांना प्रोत्साहन देणारे अनेक उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर
राज्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने ३६ लाखांहून अधिक भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठवून त्यांचे आभार मानले. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या सहभागाशिवाय कोणत्याही राज्याचा किंवा देशाचा विकास शक्य नाही. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाव’ ते ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य येत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात २५ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आणि यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षीही तितक्याच महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण योजने’चा महिलांना मोठा आधार
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘ ही महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या निधीमुळे अनेक महिलांना स्वतःचे लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली आहे. यामुळे महिला स्वावलंबी होत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्रिय झाल्या तर कुटुंब आणि समाजही मजबूत होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने महिलांना दिलेले कर्ज १००% परत मिळाले आहे. यावरून महिलांची आर्थिक शिस्त दिसून येते. भविष्यात महिला सहकारी संस्थांनाही काम दिले जाईल.
एकही योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना आश्वस्त केले की, पुढील ५ वर्षांत महिलांसाठीची एकही योजना बंद होणार नाही. महिलांना उद्योग आणि व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या विकासासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या कल्याणासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविल्या, रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम दादर येथील योगी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.