राज्यातील अनेक महिलांची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे प्रलंबित राहिल्याने काही पात्र महिलांना दरमहा मिळणारे १५०० अनुदान बंद झाल्याची बाब जानेवारी २०२६ च्या सुमारास निदर्शनास आली असल्याची माहिती शासनाने दिली आहे. मात्र आता ही चूक दुरुस्ती करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या e-kyc करण्यासाठी आता पुन्हा ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
e-KYC प्रक्रियेबाबत शासनाचे स्पष्टीकरण
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिलेल्या उत्तरानुसार, या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणाद्वारे e-KYC प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पूर्ण करण्यास शासनाने मान्यता दिली होती.
यानंतर पात्र लाभार्थी महिलांना e-KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना पुन्हा संधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना e-KYC सुधारणा करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर आता e-KYC दुरुस्तीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ज्या लाभार्थी महिलांनी अनावधानाने चुकीचा पर्याय निवडला आहे, अशा महिलांना माहिती दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित महिलांनी आपली माहिती सुधारून e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ पुन्हा मिळू शकतो.
शासनाच्या उत्तरानुसार, तांत्रिक त्रुटी किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे काही लाभार्थी महिलांची नावे योजनेतून वगळली गेली असली तरी त्यांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत माहिती दुरुस्त करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाडकी बहीण योजना ई केवायसी अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/










