गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचा खुलासा १ जून २०२६ रोजी केला आहे.
८० लाख लाडक्या बहिणींचा अपात्रतेचा आकडा हा केवळ e-KYC चा नसून, त्यात उत्पन्न, वय आणि इतर निकषांमुळे वगळलेल्या नावांचा समावेश आहे.

या योजनेतून कोणत्याही महिलेचा अर्ज थेट बाद करण्यात आलेला नाही, असे सांगत मंत्री तटकरे यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. प्रशासनाला विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी योजनेच्या अटींपेक्षा जास्त वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांची नावे साहजिकच कमी करण्यात आली आहेत.
याव्यतिरिक्त, उत्पन्नाचा निकष पूर्ण न करणाऱ्या, आरटीओ (RTO) विभागाच्या अहवालानुसार स्वतःच्या नावावर वाहन नोंदणी असलेल्या आणि शासनाच्या इतर योजनांचा दुहेरी लाभ घेत असलेल्या अर्जदारांचा लाभ नियमानुसार थांबवण्यात आला आहे.
तसेच ज्यांनी विहित वेळेत ई-केवायसी केलेली नाही, त्यांचाही यात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवरही शासनाने कडक पावले उचलली असून, त्यांच्याकडून गेल्या आठ महिन्यांपासून वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक अडचणींमुळे काही खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांचे पैसे थांबले असण्याची शक्यता शासनाने विचारात घेतली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यांच्या नावावर कोणतीही वाहन नोंदणी नाही, आणि तरीही त्यांच्या ‘लाडकी बहीण’ किंवा इतर योजनांचा लाभ स्थगित झाला असेल, तर त्यांनी अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सर्व महिलांनी तातडीने महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा.
प्राप्त झालेल्या अशा सर्व प्रकरणांची विभागाकडून नव्याने पडताळणी केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला जाईल, अशी ठाम ग्वाही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
त्याचबरोबर पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू झाली असून, येत्या सात ते आठ दिवसांत या वितरणाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी दिलासादायक माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील एकाही पात्र लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ नये, हीच राज्य सरकारची मुख्य भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग यासाठी अत्यंत संवेदनशीलतेने प्रयत्नशील आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या पात्र महिलेपर्यंत पोहोचावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/








