Maharashtra Sevakarmi Program महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज ‘सेवाकर्मी’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या १५० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचा उद्देश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत करून प्रशासकीय कामकाजात अधिक कार्यक्षमता आणणे हा आहे. हा कार्यक्रम ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
Maharashtra Sevakarmi Program संपूर्ण माहिती
Maharashtra Sevakarmi Program कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये आणि स्वरूप:
राज्य शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यांच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत असल्यास, त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. यासाठी, सेवाविषयक बाबी विहित कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रगतीचा नियमित आढावा घेऊन आणि गुणांकन प्रक्रियेद्वारे ती मोजल्यास निरोगी स्पर्धा वाढेल, ज्यामुळे सेवाप्रवेश नियम, आकृतीबंध इत्यादी महत्त्वाच्या सेवाविषयक बाबी अद्ययावत होतील. यामुळे पदोन्नती, सरळसेवा/अनुकंपा नियुक्ती यांसारख्या बाबी वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
हा दूरगामी विचार करून, मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात मंत्रालयीन प्रशासकीय विभागात “सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रम” टप्पा १ व टप्पा २ मध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ९३ आस्थापनांचे ४७ सचिवनिहाय टप्पा १ प्राथमिक गुणांकन १ मे रोजी निश्चित करून घोषित करण्यात आले आहे. याच धर्तीवर, प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्यांच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणेसाठी १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम व आयोग यांच्या स्तरावर राबवण्याच्या सूचना देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते.
गुणांकन कार्यक्रम (मंत्रालयीन विभागस्तर):
गुणांकन सामान्य प्रशासन विभागामार्फत खालील वेळापत्रकानुसार जाहीर केले जाईल:
- १ मे २०२५: टप्पा-१ प्राथमिक गुणांकन
- १५ ऑगस्ट २०२५: टप्पा-२ अंतरिम गुणांकन
- २ ऑक्टोबर २०२५: अंतिम गुणांकन
टप्पा १ गुणांकनात समाविष्ट बाबी (१ मे २०२५ पर्यंतची कालमर्यादा):
यामध्ये एकूण १०० गुणांसाठी आठ मुद्द्यांचा समावेश आहे:
- आकृतीबंध (१५ गुण)
- सेवाप्रवेश नियम (१५ गुण)
- गट-अ व गट-ब संवर्गातील पदोन्नतीने नियुक्ती (१५ गुण)
- गट-अ व गट-ब सरळसेवा नियुक्ती (१५ गुण)
- अनुकंपा नियुक्ती (१० गुण)
- गोपनीय अहवाल (महापार) (१० गुण)
- iGOT पोर्टलवर रजिस्ट्रेशन (१० गुण)
- विभागीय चौकशी (१० गुण)
टप्पा २ गुणांकनात समाविष्ट बाबी (१५ ऑगस्ट २०२५ पर्यंतची कालमर्यादा):
यामध्ये एकूण १०० गुणांसाठी चार मुद्द्यांचा समावेश आहे:
- विभागातील गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील पदोन्नती (२० गुण)
- गोपनीय अहवाल (महापार) – गट-अ, गट-ब संवर्गातील मागील ५ वर्षातील गोपनीय अहवाल डिजिटाईज करून महापार प्रणालीवर अपलोड करणे (२० गुण)
- iGOT पोर्टलवर कर्मचाऱ्यांनी ५ प्रशिक्षण कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाण (१० गुण)
- सेवाविषयक बाबींच्या डिजिटल पोर्टलवर सेवापुस्तक अद्ययावत करणे व ऑनबोर्डिंग करणे (५० गुण)
टप्पा-१ मधील १०० गुणांचे गुणांकन १ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आले आहे. टप्पा-२ अंतर्गत टप्पा-१ मध्ये केलेल्या प्रगतीनुसार सुधारित गुणांकन व टप्पा-२ मधील बाबींचे गुणांकन अशा एकूण २०० गुणांचे विभागाचे गुणांकन १५ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल. सेवाकर्मी कार्यक्रमाचे अंतिम गुणांकन १५ सप्टेंबर पर्यंतच्या प्रगतीनुसार २ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.
मंत्रालयाबाहेरील प्रशासकीय कार्यालयांसाठी गुणांकन:
सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या गुणांकनाच्या धर्तीवर प्रत्येक प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग यातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणेसाठी त्यांच्या स्तरावर गुणांकन कार्यक्रम राबवावा आणि प्रत्येक कार्यालय/आस्थापनानिहाय गुणांकन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.
यासाठी १०० गुणांच्या गुणांकनात खालील ९ मुद्द्यांचा समावेश असेल:
- आकृतीबंध (१० गुण)
- सेवाप्रवेश नियम (१० गुण)
- सर्व संवर्गाची अद्ययावत जेष्ठतासूची प्रसिद्ध करणे (१० गुण)
- रिक्त पदी पदोन्नतीने नियुक्तीचे प्रमाण (१० गुण)
- रिक्त पदी सरळसेवा नियुक्तीचे प्रमाण (१० गुण)
- बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे (१० गुण)
- अनुकंपा नियुक्ती (गट क व गट ड) (१० गुण)
- iGOT रजिस्ट्रेशन आणि ५ कोर्स पूर्ण करणे (१० गुण)
- सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटाईज करणे (२० गुण)
पुरस्कार:
१५० दिवसांच्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमांतर्गत गुणांकनात प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या विभागाच्या सचिव व संबंधित आस्थापनांना तसेच प्रत्येक क्षेत्रीय स्तरावर गुणांकनानुसार प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या आस्थापना प्रमुखांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पीडीएफ डाउनलोड करा