Graduate Pay Scale: इयत्ता 6 वी ते 8 वी वर्गास अध्यापन करणाऱ्या विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, अरुण लाड, जगन्नाथ अभ्यंकर यांनी सहभाग घेतला.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, १४ नोव्हेंबर १९७९ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांना जोडलेल्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गांमध्ये चार किंवा अधिक शिक्षक पात्र असल्यास मान्य पदांपैकी २५ टक्के पदे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वाढीव वेतनश्रेणीत रूपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली होती.
त्यानंतर १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी किमान एक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक नियुक्त करण्याची, विषयनिहाय ज्येष्ठता यादी तयार करण्याची तसेच इयत्ता सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी एक तृतीयांश शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतनश्रेणी देण्याची तरतूद करण्यात आली.
तसेच १९७९ च्या शासन निर्णयानुसार पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळालेल्या शिक्षकांचे वेतन संरक्षणही कायम ठेवण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ८ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार शिक्षकांना नियुक्ती किंवा पात्रता दिनांकापासून पदवीधर वेतनश्रेणी ८ आठवड्यांत लागू करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा परिषदांना दिले आहेत.
या न्यायालयीन निर्णयामुळे निर्माण झालेल्या कायदेशीर आणि आर्थिक परिणामांचा विचार करून संबंधित प्रस्ताव विधि व न्याय विभाग तसेच वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असून, दोन्ही विभागांच्या अभिप्रायानंतर शासन पुढील आवश्यक कार्यवाही करेल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.








