राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने Google for Education सोबत महत्त्वाचा करार केला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुढील दीड वर्षात राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना Google AI Educator Series अंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हा करार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडला. Google for Education चे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव श्री. ताशीलदार यांनी उद्देशपत्रावर स्वाक्षरी केली.
शिक्षकांना मिळणार आधुनिक AI आणि डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण
या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिकवणे हा आहे. बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
प्रशिक्षणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. सुरुवातीला निवडक मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतील. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत AI प्रशिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शासनावर कोणताही आर्थिक भार नाही
या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. संपूर्ण प्रशिक्षण Google for Education मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांनाही होणार फायदा
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, 21 व्या शतकातील शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, अशी विभागाची अपेक्षा होती.
Google for Education सोबतच्या या सहकार्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून हे प्रशिक्षण प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविले जाईल. त्यामुळे शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल तसेच AI बाबत जनजागृती वाढण्यास मदत होईल.
प्रशिक्षणात काय शिकवले जाणार?
या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांना पुढील सुविधा आणि कौशल्यांचा लाभ मिळणार आहे.
शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता विकसित करणे, डिजिटल कौशल्ये वाढविणे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये स्थानिकीकरण केलेली प्रशिक्षण सामग्री उपलब्ध करून देणे, सुरक्षित डिजिटल ओळख निर्माण करणे तसेच Google AI साधनांचा शैक्षणिक वापर प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षकांच्या व्यावसायिक विकासालाही चालना दिली जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत उपक्रम
हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यामुळे तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धतींना प्रोत्साहन मिळणार असून राज्यातील आयसीटी प्रयोगशाळा, स्मार्ट वर्गखोल्या, कनेक्टेड क्लासरूम, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळा यांसारख्या डिजिटल शिक्षण सुविधांना अधिक बळ मिळणार आहे.
कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव श्री. ताशीलदार, Google for Education चे वरिष्ठ अधिकारी संजय जैन तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









