Arogya Vibhag Bharti Appointment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांसह संलग्न नऊ रुग्णालयांतील गट ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
Table of Contents

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नव नियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गट ‘ड’ संवर्गातील अनेक पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या रिक्त पदांवर तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली आणि एकत्रित पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले.
रामगिरी येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या १३ उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेश देण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो रुग्णालय, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय आणि त्यांच्या संलग्न रुग्णालयांतील गट ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणासह मागणीपत्र मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून एकूण ६८० रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते आणि प्राप्त अर्जांमधून ६८० उमेदवारांची निवड करण्यात आली.
Arogya Vibhag Bharti Appointment
या भरतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६६ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसाठी ३४४ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी १९ पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेरसाठी ११ पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५७ पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १३५ पदे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी २२ पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासाठी ३ पदे आणि शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी २३ पदांचा समावेश आहे.
या मोठ्या भरतीमुळे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमधील रुग्णसेवेला अधिक बळकटी मिळणार आहे. गट ‘ड’मधील कर्मचाऱ्यांची भरती रुग्णसेवेसाठी अत्यंत आवश्यक होती, अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि निवड समितीचे सदस्य सचिव डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केली.
आरोग्य विभाग वेबसाईट: https://phd.maharashtra.gov.in/mr/