Ativrushti Nuksan Bharpai Relief Package: महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाने २७ मार्च २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ज्यांचे पशुधन दगावले आहे, अशा पशुपालकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो बाधित पशुपालकांना हक्काची मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
नुकसान भरपाईचे सुधारित आणि वाढीव दर
या शासन निर्णयानुसार विविध प्रकारच्या पशुधनासाठी भरघोस मदत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७,५०० रुपये, तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२,००० रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.
तसेच लहान जनावरांच्या मृत्यूपोटी २०,००० रुपये, शेळी किंवा मेंढीसाठी ४,००० रुपये आणि कुक्कुटपालनासाठी प्रति पक्षी १०० रुपये या दराने मदत दिली जाईल. याशिवाय, ज्या पशुपालकांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना प्रति गोठा ३,००० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
मदतीचे निकष शिथिल आणि सर्वांसाठी खुले
बाधित पशुपालकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सरकारने जुन्या जाचक अटी आणि निकष शिथिल केले आहेत. आता केवळ अल्प किंवा अत्यल्प भूधारकच नव्हे, तर सर्व श्रेणीतील आपदग्रस्त पशुपालक या मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.
यापूर्वी जनावरांच्या संख्येवर असलेली मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून, मृत किंवा बेपत्ता असलेल्या सर्वच्या सर्व जनावरांसाठी आता शासन स्तरावरून मदत दिली जाणार आहे.
मदत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि अटी
मदत मिळवण्यासाठी मृत किंवा बेपत्ता पशुधनाची नोंद भारत पशुधन ॲप, २१ वी पशुगणना किंवा लसीकरण नोंदवहीमध्ये असणे आवश्यक आहे.
ज्या पशुधनाचा पूर किंवा अतिवृष्टीमुळे शोध लागलेला नाही, त्यांच्यासाठी स्थानिक महसूल आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करणे अनिवार्य आहे.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा केली जाईल, मात्र विमा उतरवलेल्या जनावरांना विमा कंपनीकडून भरपाई मिळाल्यास ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.
अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचा २७ मार्च २०२६ रोजीचा शासन निर्णय डाउनलोड करा










