देशातील दर्जेदार शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या पीएम यशस्वी (PM YASASVI) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी मर्यादित कालावधी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, किती शिष्यवृत्ती मिळेल, पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या योजनेचा लाभ ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल २.५० लाख रुपये असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड मागील वर्गातील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्तायादीतून केली जाणार असून, किमान ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सलग वर्षांमध्ये १०० टक्के निकाल देणाऱ्या सर्वोत्तम शाळांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.
योजनेनुसार इयत्ता ९ वी आणि १० वीतील विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या रकमेत शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके आणि गणवेशाचा खर्च समाविष्ट आहे.
इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार असून त्यामध्ये शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश, प्रयोगशाळा शुल्क तसेच कोचिंग फीचाही समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्ज प्रक्रिया १ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी आणि संस्थांकडून पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर अंतिम पडताळणीची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आहे.
ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत PM YASASVI (Top Class Education in Schools for OBC, EBC and DNT Students) ही एकत्रित शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज विहित मुदतीत व अचूक भरून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







